लॉजवर सापडला मृतदेह : हात, पोटावर वार करून केला खून
वडगाव मावळ – वडगाव येथील एका लॉजवर एका 16 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर ब्लेडने हल्ला करीत तिचा गळा चिरून खून केला. वडगाव-आंबी एमआयडीसी रस्त्यावरील बुधवारी (दि.4) दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. आरोपी फरार झाला असून, पोलिसांनी चौकशीसाठी संशयित आरोपीच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले
आहे.
याप्रकरणी श्रीराम सुखदेव गिरी (वय 20, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. नवलाख उंब्रे येथील वास्तव्यास असलेली विद्यार्थिनी तळेगावातील एका महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेत अकरावी वर्गात शिकत
होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली विद्यार्थिनीला आरोपी श्रीराम याने बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता वडगाव हद्दीतील निसर्गवारा हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्या ठिकाणी आरोपी श्रीराम गिरी याने तिचा ब्लेडने गळा चिरला. आरोपीने दोन्ही हातावर व पोटावर वार केला. आरोपी श्रीराम गिरी याने युवतीला रक्ताच्या थारोळ्यात टाकून फरार झाला. अतिरक्तस्त्राव झाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनास्थळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावर, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक निरीक्षक नितीन नम, उपनिरीक्षक दिलीप देसाई यांनी भेट दिली. विद्यार्थिनीचे विच्छेदन करण्यासाठी सर्वरोगनिदान रुग्णालय ससून, पुणे येथे पाठविण्यात आला आहे. वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली. आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.