सालकरी पाहिजे की मालक : ना. शिंदे

40 दिवस मला द्या, 5 वर्षे तुमच्यासाठी
पालकमंत्री राम शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करताना विधानसभा निवडणूक 15 ऑक्‍टोबरच्या आसपास होणार असल्याने पुढील 40 दिवस तुम्ही मला द्या. पुढील 5 वर्षे मी तुमच्यासाठी असणार आहे, असे आवाहन केले. 

जामखेड  – जामखेडचा शेतीचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी कृष्णा-भीमा-सीना स्थिरीकरण प्रकल्प राबविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी देतानाच, सालकऱ्याचा मुलगा सालकरी राहतो. मात्र मालकाचा मुलगा मालकच राहतो. त्यामुळे कर्जत जामखेडच्या जनतेने सालकरी निवडायचा की मालक निवडायचा, याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी राम भोजणे, सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सूर्यकांत मोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, सोमनाथ राळेभात, शरद भोरे, ज्योती क्रांती पतसंस्थेचे अध्यक्ष आजीनाथ हजारे, सखाराम भोरे, सलीम बागवान, अमजद पठाण, मनोज कुलकर्णी, प्रवीण सानप, मकरंद काशीद यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. शिंदे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, गेल्या 70 वर्षांत या मतदारसंघात नेमके कोणते काम केले, हे सांगायला नाही. त्यामुळे रांगोळी स्पर्धा घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. स्व. गोपीनाथ मुंढे यांनी जामखेड तालुक्‍यातील भूतवडा जोड तलाव आणि अमृतलिंग तलावाच्या कामास प्रारंभ केला. मात्र नंतर 15 वर्षांत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारने या दोन्ही प्रकल्पांना कसलाही निधी दिला नाही. त्यामुळे हे प्रकल्प रखडले. 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मी या रखडलेल्या दोन्ही प्रकल्पांना प्राधान्य देत निधी मिळवून देत कामे पूर्ण केली. तालुका पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम याच लोकांनी केले. आज मात्र निवडणुकीच्या तोंडावर जनतेची कुचंबणा करण्याचे काम या लोकांकडून सुरू आहे. ओरनेट टेक्‍नोलॉजीचे राम भोजणे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.

Leave A Reply

Your email address will not be published.