नवी दिल्ली -भारतीय आणि अमेरिकी लष्करांचा संयुक्त युद्धाभ्यास पुढील आठवड्यापासून राजस्थानमध्ये सुरू होणार आहे. त्यातून दोन्ही देशांच्या लष्करी ताकदीचे दर्शन घडणार आहे.
भारतीय आणि अमेरिकी लष्करांचा युद्धाभ्यास 8 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत सुमारे पंधरवडाभर चालेल. त्यामध्ये दोन्ही देशांचे प्रत्येकी 250 सैनिक सहभागी होतील. हिंद-प्रशांत विभागात चीनकडून आक्रमक हालचाली केल्या जात आहेत. चीनचा जवळचा मित्र असणाऱ्या पाकिस्तानच्या आगळिकीही नित्याच्याच आहेत. तशात भारत-पाकिस्तान सीमेजवळ होणाऱ्या युद्धाभ्यासाला दुहेरी महत्व आहे.
युद्धाभ्यासाच्या माध्यमातून भारतीय आणि अमेरिकी लष्करांमध्ये पारंपरिक आणि अपारंपरिक युद्धासाठी आवश्यक कौशल्ये, तंत्रांची देवघेव होईल. मागील काही वर्षांपासून भारत आणि अमेरिकेतील संरक्षणविषयक संबंध मजबूत बनले आहेत. ते संबंध आणखी व्यापक बनवण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला आहे. अमेरिकेतील सत्ताबदलानंतर प्रथमच संयुक्त युद्धाभ्यास होत असल्यामुळेही त्याचे महत्व वाढले आहे. याआधी अडीच महिन्यांपूर्वी भारत आणि अमेरिकेची नौदले चार देशांच्या संयुक्त कवायतींमध्ये सहभागी झाली होती. उर्वरित देशांमध्ये जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश होता.