नवी दिल्ली – संसदेचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या राज्यसभेवर प्रदीर्घ काळ वर्चस्व राखणाऱ्या कॉंग्रेसचे संख्याबळ नीचांकी पातळीवर गेले आहे. तर, भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ एनडीएची त्या सभागृहातील स्थिती आणखी भक्कम झाली आहे.
राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 11 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली. उत्तरप्रदेशातील 10 पैकी 8 जागा भाजपने पटकावल्या. उत्तराखंडमधील एकमेव जागाही भाजपच्या खात्यावर जमा झाली. त्यामुळे राज्यसभेतील भाजपचे संख्याबळ वाढून 92 इतके झाले आहे. तर, एनडीएने शंभरी पार केली आहे.
आता सत्तारूढ आघाडीचे राज्यसभेत 104 सदस्य असतील. कॉंग्रेसचे राज्यसभेत केवळ 38 सदस्य आहेत. एकूण 242 सदस्यीय राज्यसभेतील कॉंग्रेसचे ते संख्याबळ आजवरचे नीचांकी आहे. आताच्या निवडणुकीत भाजपच्या 3 राज्यसभा सदस्यांची फेरनिवड झाली.
त्यामुळे भाजपचे संख्याबळ 6 ने वाढले. तर कॉंग्रेसच्या आधीच्या संख्याबळात 2 ने घट झाली. संसदेचे कनिष्ठ सभागृह असणाऱ्या लोकसभेत एनडीएकडे स्पष्ट बहुमत आहे. मात्र, राज्यसभेत अजूनही सत्तारूढ आघाडी बहुमतापासून दूरच आहे. मात्र, ताज्या निवडणुकीमुळे सत्तारूढ आघाडीला आणखी बळ मिळाले आहे.