नवी दिल्ली – दहशतवादी कारवायांचा कट रचणाऱ्या एका मदरसा शिक्षकाला पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ती महत्वपूर्ण कारवाई केली.
अब्दुल मोमीन (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या मदरसा शिक्षकाचे नाव आहे.
अल्-कायदा या दहशतवादी संघटनेकडे आकर्षित होऊन एक गट भारतविरोधी कारवाया करण्याचा कट रचत असल्याची माहिती एनआयएला मिळाली. त्यावरून 11 सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. त्याप्रकरणी याआधी 10 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून अब्दुलचे नाव पुढे आले. त्याला रविवारी अटक करण्यात आली.
संबंधित गटाने देशाच्या विविध भागांत दहशतवादी कारवाया घडवण्याचा कट रचला होता. त्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये अब्दुल सामील झाला होता. आपल्या गटात नव्या सदस्यांना सामील करण्यासाठी तो प्रयत्नशील होता.
दहशतवादी कारवायांसाठी पैसा गोळा करण्याच्या उद्देशातूनही तो सक्रिय होता. अटकेनंतर त्याला बंगालमधील मुर्शिदाबाद न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या परवानगीनंतर त्याला दिल्लीला नेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.