फरहान अख्तरचा “तुफान’ मे महिन्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असे या वर्षाच्या सुरुवातीलाच समजले होते. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही तारीख पुढे ढकलली गेली होती. आता ती तारीख निश्चित झाली आहे. 16 जुलैला “तुफान’ ऍमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे.
राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित “तुफान’मध्ये फरहान अख्तर बॉक्सिंगच्या रिंगमधील थरार दाखवणार आहे. हा सिनेमा या वर्षातील सर्वात मोठा स्पोर्टस मुव्ही असणार आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील तब्बल 240 पेक्षा अधिक देशांमध्ये या सिनेमाचा थरार एकाचवेळी अनुभवता यावा म्हणून तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.
राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांची जोडी “भाग मिल्खा भाग’मध्ये हिट झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती “तुफान’मध्ये होण्याची अपेक्षा आहे. ही मुंबईत डोंगरी भागात मोठा झालेल्या एका अनाथ मुलाची गोष्ट आहे. एका महिलेच्या प्रेमामुळे या मुलाचा आत्मविश्वास जागा होता आणि तो बॉक्सिंग चॅम्पियन बनतो. त्याचा हा प्रवास बघण्यासाठी आणखी थोडे दिवस वाट बघायला लागणार आहेत.