पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपळे गुरव येथील, काटे पुरम चौकात पदपथावर दोन्ही बाजूंनी दूचाकी, चारचाकी वाहने नित्याचीच लावल्याने त्याठिकाणच्या पदपथावरुन चालता येत नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरुन चालावे लागत आहे. परंतु रस्त्यावरुन चालत असताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
वाहतूक पोलिस पुरम चौकात असून सुध्दा कारवाई होत नसल्यामुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करित आहेत. तसेच याबद्दल प्रदीप गायकवाड उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी पोलीस निरीक्षक वाहतूक सांगवी विभागास निवेदन दिले आहे.
पिंपळे गुरव येथील, काटे पुरम चौकात पदपथावर दोन्ही बाजूंनी वहाने उभी करून, तुमच्या वाहतुक विभागाला एकप्रकारे आव्हान दिले आहे कि, ” करा, काय कारवाई करायची ती करा, आम्ही वाहतूक विभागाला भीत नाही. तसेच, नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्य गृहासमोर टेम्पो उभे करुन, बिनधास्तपणे व्यवसाय जोरात सुरू आहे.
महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग तर नावाला शिल्लक आहे, ते येण्याआधीच पदपथावर ठाण मांडलेल्यांना निरोप मिळतो. अशा भीषण परिस्थितीत येथील रहिवासी पायी प्रवास करत असताना, अपघाताचा धोका निर्माण होत आहे. एखादा अपघात झाल्यास या अपघाताला जबाबदार कोण? तर पुरम चौकातील पदपथावरील अतीक्रमण त्वरित मोकळे करुन द्यावे. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.