पिंपरी, (प्रतिनिधी) – महावितरणकडून पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात सुरु असलेल्या वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे आहेत. येत्या पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही कामे सुरु करण्यात आली आहेत.
महावितरण पिंपरी चिंचवड शहराअंतर्गत पिंपरी, चिंचवड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, काळेवाडी, हिंजवडी, पुनावळे, ताथवडे, वाकड इत्यादी भाग येत असून या सर्व ठिकाणी मान्सून पूर्व देखभाल व दुरूस्तीची कामे युध्द पातळीवर करण्यात येत आहेत.
पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात. यात प्रामुख्याने विविध कामांचा समावेश आहे. उपरी वीजवाहिन्यांना स्पर्श करणार्या झाडांच्या फांद्या तोडूणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे, खांबांचे, उपकेंद्रातील उपकरणांचे पूर्ण अर्थिंग तपासणे व तुटलेल्या अर्थवायर पूर्ववत करण्याचे काम होत आहे.
ऑईल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वाकलेले किंवा गंजलेले वीज खांब, उच्चदाब व लघुदाब वीजवाहिन्यांना आवश्यकतेनुसार गार्डस् पुरवणे, तारांमधील झोल काढण्याचे कामे केली जात आहेत.
पावसाचे पाणी साचणार्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे, लघुदाब वितरण पेटीची दुरुस्ती, दरवाजा नसल्यास लावणे आदी कामे केली जात आहेत. झाडांच्या फांद्या छाटणीसाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची मदत घेतली जात आहे.
वीजपुरवठा खंडित होण्याची काही कारणे
खराब झालेले डिस्क व पीन इन्सूलेटरमध्ये पाणी गेल्यास, खोदाकाम करताना भूमिगत वाहिन्यांमध्यो दोष निर्माण होणे, पावसामुळे केबलमधील आर्द्रता येणे, वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो.
दरवर्षी पावसाळ्यात ही कामे केली जातात. महावितरण पिंपरी चिंचवड विभाग अंतर्गत देखभाल दुरूस्तीची ८० टक्के कामे पार पडलेली असून उर्वरीत कामे ही येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहेत. सर्व शाखा अभियंते व उपविभागीय अभियंता कामावर देखरेख ठेवत आहेत.
ओव्हरहेड वायर असल्याने वीजपुरवठा सुरळीत रहावा व वीजसुरक्षा या दोन बाबी लक्षा घेऊन सर्व कामांची देखभाल दुरुस्ती केली जात आहे. ३१ मे पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील. – निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण.