मुंबई – शेअर बाजार निर्देशांक कमालीच्या उच्च पातळीवर आहेत. भारतासह विविध देशात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेकेखोरपनामुळे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचा पेचप्रसंग कायम आहे. अशा परिस्थितीतही गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी केल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांकात अर्धा टक्क्यापर्यंत वाढ झाली.
अशा अनिश्चित परिस्थितीमुळे काल शेअर बाजारात बरीच विक्री होऊन निर्देशांक कमी झाले होते. मात्र दीर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आज काही निवडक शेअरची खरेदी केल्याचे दिसून आले. त्यातल्या त्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतातील खरेदी वाढवीत आहेत. या गुंतवणुकदारांनी काल 1,180 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केले.
आता भारतातील कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीतील ताळेबंद जाहीर झाले आहेत. त्यामुळे स्थूल अर्थव्यवस्था आणि जागतिक परिस्थिती शेअर बाजार निर्देशांकांना दिशा देईल. अमेरिकेतील राजकीय पेचप्रसंगाकडे गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष राहणार असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.
आज झालेल्या खरेदीचा फायदा एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक, बजाज फायनान्स, कोटक बॅंक, एअरटेल, नेस्ले, एनटीपीसी या कंपन्यांना झाला. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, ऍक्सिस बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
लक्ष्मीविलास बॅंकेचा शेअर कोसळला…
लक्ष्मीविलास बॅंकेची आर्थिक परिस्थिती खालावल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने या बॅंकेच्या व्यवस्थापनात लक्ष घातले आहे. त्यामुळे ठेवीदारांना मर्यादित व्यवहार करता येणार आहेत. या कारणामुळे लक्ष्मीविलास बॅंकेचा शेअर गेल्या काही दिवसापासून पीछाडीवर आहे. आजही या बॅंकेचा शेअर दहा टक्क्यांनी कोसळला. या बॅंकेचे प्रशासक म्हणून रिझर्व बॅंकेने टी एम मनोहरन यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे दोन महिने तरी या बॅंकेच्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.