राज्यात एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : सध्या देशात लव्ह जिहाद प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातही भाजपा नेत्यांकडून लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याची मागणी होत आहे. भाजपाच्या या मागणीवर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. परंतू शिवसेनेने ‘सामना’ मधील अग्रलेखातून भाजपाच्या या मागणीचा खरपूस समाचार घेतला आहे. एक वर्षापूर्वी पहाटे राज्यात लव्ह जिहाद झाला. तरीही महाविकास आघाडी सरकार आले आणि टिकले म्हणत शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे.

अग्रलेखात शिवसेनेने बिहारमध्ये भाजपाने पुढाकार घेऊन लव्ह जिहादचा कायदा आणण्याची मागणी केली. नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे. भाजपा तिकडे कायदा आणणार असेल तर तिकडची मार्गदर्शत तत्वे महाराष्ट्रालाही उपयोगी पडतील. एखाद्या विषयाचे वैचारिक नेतृत्व करण्याची संधी बिहारलाही मिळाली पाहिजे. लव्ह जिहादच्या विषयावर बांग देऊन राज्य सरकारला हादरे देऊ या भ्रमातून भाजपा नेत्यांनी बाहेर पडावे असा सल्लाही अग्रलेखातून देण्यात आला आहे.

यापुढे अग्रलेखात भाजपाच्या दुटप्पी धोरणांवरही शिवसेनेने सडकून टीका केली आहे. लव्ह जिहाद बाबत भाजपाचे गृह राज्यमंत्री यांनी संसदेत, या संकल्पनेला कायद्यात कोणतेही स्थान नसल्याचे सांगितले. केंद्रीय तपास यंत्रणांकडून अद्याप या प्रकरणी एकही गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही. लव्ह जिहादची व्याख्या आधी ठरवावी लागेल. ती व्याख्या योगीजी आणि शिवराजमामांनी ठरवली आणि देशाने स्विकारली असे होणार नाही, असे म्हणत शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.