दुष्काळ निवारणात राज्य शासन तोकडे पडले

…तर पाणीटंचाईची तीव्रता कमी असती
रोहित पवार यांचा राज्य शासनाला टोला

पुणे  –
जिल्ह्यात यापूर्वी दुष्काळ पडला होता. परंतू गरज नसताना आणि कोणताही अभ्यास न करता साडेतीन टीएमसी पाणी उजनीतून दुसऱ्या राज्यात सोडून दिले. त्यावरूनच हे सरकार, येथील पालकमंत्री आणि अधिकारी नियोजनात कमी पडत असल्याचे दिसून येते. पाण्याबाबत सहा महिन्यांपूर्वीच नियोजन झाले असते आणि साडेतीन टीएमसी पाणी सोडले नसते तर नक्‍कीच पाणी टंचाईची तीव्रता कमी असती. असे वक्‍तव्य करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी सरकारच्या ढिसाळ नियोजनावर निशाना साधला. पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईवर राज्य शासनाचे वाभाडे काढले.

जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि नियोजनाबाबत विचारले असता, पवार म्हणाले की, शहर आणि ग्रामीण हा चुकीचा संघर्ष आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, अन्य मंत्री आणि अधिकारी यांनी पाण्याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. परंतू तेच नियोजनामध्ये कमी पडल्यामुळे आज ही वेळ आली आहे. पाणी वेळेत आणि पुरेशा प्रमाणात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आणि शहरातील नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. ईव्हीएम मशीनबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्‍तव्यावरून “आत्ताच पराभव स्वीकारला’, असा टोला विरोधकांकडून लगावला जात आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले, ईव्हीएम मशीनबाबत काही अभ्यासू लोकांनी मांडलेल्या धक्‍कादायक मुद्दयावर बोलताना पवार यांनी ही भीती व्यक्‍त केली.

तसेही निवडणुकीच्या काळात चटपटीत बोलणे भाजपा आणि शिवसेनेला आवडत होते. मात्र, लोकांचा कल पाहता आपण पडू, अशी भीती युतीला वाटत आहे. दरम्यान, शरद पवार यांनी निवडणूक होताच दुष्काळग्रस्त गावांना भेटी दिल्या. बैठकांचे आयोजन केले. मदत केली. मात्र, मंत्री म्हणून तुम्ही का दुष्काळग्रस्त भागात गेला नाहीत, असा सवाल रोहित पवार यांनी राज्य सरकारला केला. मात्र, पवारांचे नाव घेतल्याशिवाय टीव्हीसमोर येता येत नाही. त्यामुळे विरोधक अशाप्रकारचे वक्‍तव्य करीत असल्याचे सांगत रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.