मळवी धरणातील पाण्याने गाठला तळ

फलटण – सालपे ता. फलटण येथील घाटपायथ्याशी असणाऱ्या मळवी धरणातील पाणी पुर्णपणे संपुष्टात आल्याने परिसरातील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. मागील वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाला असला तरी परिसरातील सर्व छोटी मोठी धरणे पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने आजवर त्याचा मोठा फायदा शेतकरी वर्गाला झाला. धरणातील पाण्याचे परक्‍युलेशन होत असल्याने परिसरातील विहीरींना व शेतीला त्याचा मोठा फायदा होतो. मात्र तेच धरण आता पाण्याविणा कोरडे पडल्याने अतिशय दयनीय अवस्था झाली आहे, धरणात पाणी नसल्याने परिसरातील विहीरीची पाणी पातळी खोलवर गेली असल्याने भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

आडात नाही तरं पोहऱ्यात कसे येणार अशी अवस्था झाली आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने, प्रखर ऊन्हामुळे परिसरातील छोटी मोठी धरणे पाण्याविणा कोरडी पडली आहेत. कडक ऊन्हाळ्यामुळे सर्वांना दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी वर्गाचे कंबरडेच मोडून गेले आहे, शेतीला पाणी नसल्याने शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला आहे, शेतकरी वर्ग आ वासून वरुणराजाच्या आगमणाची वाट पहात आहे. त्यातच यंदा पडलेल्या भीषण दुष्काळामुळे मोठ्या धरणातील पाणीसाठाही संपत आला आहे, थोडया प्रमाणात का होईना धोम-बलकवडी धरणातील पाणी सोडून परिसरातील छोटी मोठी धरणे भरावीत अशी परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गातून आग्रही मागणी होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.