समन्वय, नियोजनाचा अभाव : होम क्वॉरन्टाइन रुग्णांकडे पर्याय नाही
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. ही समाधानाची बाब असली तरी करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका मात्र कायम आहे. समन्वय व नियोजन नसल्याने स्वतः करोना बाधित असलेले परंतु “होम क्वॉरन्टाइन’ रुग्णालाच बाजार किंवा मेडिकलमध्ये जाऊन आवश्यक वस्तू व औषधे आणावी लागत आहे. परिणामी औषधांच्या शोधात करोनाचा प्रसार होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातर्फे शहरात विविध ठिकाणी करोना तपासणी केंद्र उघडण्यात आले आहे. या केंद्रात टेस्ट करणाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर संबंधित व्यक्ती हा खासगी रुग्णालयात दाखल होतो किंवा महापालिकेच्या रुग्णालयात जातो. महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर करोना बाधित रुग्णाचा रिपोर्ट पाहून त्याला तपासतात.
त्यांच्या ऑक्सिजन लेव्हलची पाहणी करतात आणि त्याला गरज असेल तर रुग्णालयात भरती करून घेतात. त्याला काहीही लक्षणे नसेल, किंवा भरती करून घेण्याची आवश्यकता नसेल तर त्याला 14 दिवसांसाठी “होम क्वॉरन्टाइन’ राहण्याचा सल्ला देतात. त्याचप्रमाणे चार ते पाच दिवस रुग्णालयात उपचार घेऊन परतणाऱ्या रुग्णांची डिस्चार्ज देताना चाचणी केली जात नाही. डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांना देखील काही दिवस “होम क्वॉरन्टाइन’ केले जाते. रुग्णांना आवश्यक असणारी औषधे लिहून दिली जातात.
बहुतांश प्रकरणात बाधित व्यक्ती एकटाच असल्याने किंवा घरातील सर्वचजण बाधित आल्याने रुग्ण घरी जाताना मेडिकलमधून स्वतःच औषधे घेऊन घरी जातो. नेमकी ही बाबच गंभीर आहे. करोनाबाधित व्यक्ती औषधाच्या दुकानात जातो म्हणजे तो इतरांच्या संपर्कात येतो. पर्यायच नसल्याने इतरांनाही धोक्यात घालतो. तसेच “होम क्वॉरन्टाइन’चा कालावधी पूर्ण होईपर्यंत त्यांना अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडावेच लागते.
‘होम क्वॉरन्टाइन’ केलेल्या नागरिकांना सर्व वस्तू घरपोच मिळाव्यात याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. असाच काहीसा प्रकार अन्न-धान्य व भाजीपाल्याच्या बाबतीत आहे. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी करोना बाधित व्यक्ती बाजारातही जाते. जर शेजाऱ्याने पुरेशी काळजी घेऊन त्यास जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्यास बाधित व्यक्तीला बाहेर जाण्याची गरज नाही.
पालिकेने औषध उपलब्ध करून देण्याची गरज
करोनावर एखादे ठोस औषध आलेले नाही. तरीदेखील बाधितास उपचारामध्ये मदत होईल, अशी औषधे डॉक्टरांकडून लिहून दिली जातात. जर एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल तर त्याला पिंपरी चिंचवड महापालिकेने रिपोर्टसोबतच आवश्यक औषधेही उपलब्ध करून देण्याची गरज आहे. “होम क्वॉरन्टाइन’ होणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातूनच औषधे उपलब्ध केल्यास करोनाचा संसर्ग रोखण्यात मोठ्या प्रमाणावर यश येईल.