पिंपरी – भारतातील सर्वांत उंच असणारी सर्व शिखरे सर करण्याचे ध्येय घेऊन सिंहगड किल्ल्यावर अनेक वर्षांपासून लिंबू सरबत, ताक विकणाऱ्या सोनाबाई कोंडीबा उघडे यांचा मुलगा लहू उघडे हा जगातील सर्वांत उंच असणाऱ्या गिरीमोहिमेवर निघाला आहे. सुमारे 60 ते 65 दिवस असणाऱ्या या मोहिमेस येत्या 2 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.
माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी सज्ज झालेल्या लहूला नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने खारीचा वाटा म्हणून अर्थसहाय्य दिले. त्याला या मोहिमेसाठी सुमारे 35 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. फेरीवाल्यांनी जमा केलेले अर्थसहाय्य देत स्वागत व ध्वज प्रदान कार्यक्रम निगडी येथे करण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे प्रसाद बागवे, गिर्यारोहक लहू उघडे, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, महासंघाच्या महिला अध्यक्षा वृषाली पाटणे, सागर बोराडे, ओमप्रकाश मोरया, प्रसाद मारणे, वीरेंद्र गुप्ता, रामा बिराजदार, मनोज यादव, सुशील खरात, विशाल मेहेर, हरी भोई, आबा शेलार, अशोक गुप्ता आदी उपस्थित होते.
काशिनाथ नखाते म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या आयुष्याते एक ध्येय ठेवलेले असत. आयुष्यामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत असल्यास अशक्य ते शक्य होते. प्रसाद बागवे म्हणाले की, लहू हा प्रतिकूल परिस्थितीतही या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाकाली तो अनेक दिवसांपासून सराव करत आहे.
खानापूर हे गाव असून आई सिंहगडावर लिंबू सरबत, ताक विक्री करते. सिंहगडावर येणाऱ्या पर्यटक, ट्रेकर्सकडून प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाल्याने या क्षेत्राकडे मी वळालो. गेल्या 5 वर्षांपासून माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत सह्याद्रीतील सुमारे दोन हजार शिखरे सर केली आहेत. तर, हिमालयातील फ्रेंडशिप, युनाम, भागिरथी-2 ही शिखरे सर केली आहेत. माऊट एव्हरेस्ट सर करण्यासाठी अजून सुमारे 10 लाख रुपये अर्थसहाय्याची गरज आहे.
– लहू उघडे, गिर्यारोहक