निव्वळ आणि ढोबळ अनुत्पादक मालमत्तेत वाढ : रिझर्व्ह बॅंकेची माहिती
पुणे – बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था म्हणजे “एनबीएफसी’मध्ये वाढलेल्या अनुत्पादक मालमत्तेचा प्रश्न निर्माण झाला होता. तो कमी व्हावा, म्हणून बरेच प्रयत्न झाले असले तरी या कंपन्यांची अनुत्पादक मालमत्ता वाढली आहे.
रिझर्व्ह बॅंकेने या संदर्भात जारी केलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये बिगर बॅंकिंग वित्तीय कंपन्याची अनुत्पादक मालमत्ता 6.1 टक्क्यांवर गेली आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये ही अनुत्पादक मालमत्ता 5.3 टक्के होती. आयएल अँड एफएस या मोठ्या एनबीएफसी कंपनीने बरेच कर्ज परत करण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर त्याचा संसर्ग इतर “एनबीएफसी’ कंपन्या आणि बॅंकांनाही झाला होता.
रिझर्व्ह बॅंकेच्या माहितीनुसार, या कंपन्यांचे निव्वळ “एनपीए’ 3.4 टक्क्यांवर गेले आहे. गेल्या वर्षी ते 3.3 टक्के होते. “एनबीएफसी’ घरासाठी आणि इतर अनौपचारिक क्षेत्रासाठी बरेच कर्ज देतात. या कंपन्या अडचणीत आल्यापासून या कंपन्यांकडून कर्जपुरवठा कमी झालेला आहे. त्यामुळे अर्थमंत्रालयाने बॅंकांना “एनबीएफसी’ना काही प्रमाणात मदत करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरपर्यंत या कंपन्यांच्या अनुत्पादक मालमत्तेत थोडीशी वाढ झाल्याचे अहवालात म्हटले असले, तरी अहवालात या महिन्यासाठीची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
रिझर्व्ह बॅंकेच्या माहितीनुसार, छोटे कर्ज देणाऱ्या एनबीएफसीची-एमएफआयची परिस्थिती थोडीशी सुधारलेली आहे. या कंपन्यांचा अनुत्पादक मालमत्ता 7.5% वरून 4.3 टक्क्यांवर आली आहे. या सर्वच कंपन्यची परिस्थिती सुधारावी, यासाठी रिझर्व्ह बॅंक आणि अर्थमंत्रालय इतर बॅंकांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये एनबीएफसीची परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.