इस्लामाबाद – इराणने काल इराक आणि सीरियातील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. इराणने पाकिस्तानमधील बलुचिस्तान भागातही क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यामध्ये दोन लहान मुले ठार झाली. इराणने केलेल्या या हल्ल्यावरून पाकिस्तानने थयथयाट केला आहे. या हल्ल्याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
बलुचिस्तान प्रांतातील जैश अल अदी या दहशतवादी संघटनेच्या दोन तळांवर इराणने काल क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात हे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले गेले, असे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
हल्ला झालेला हा भाग ग्रीन माऊंटन नावाने ओळखला जातो. क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या सामायिक माऱ्याने हे दोन तळ उद्ध्वस्त केले गेले होते, बलुचिस्तानमधील सीमेजवळच्या पांजगौर गावात जैश अल-अदी या संघटनेचे तळ असल्याचे इराणने पूर्वीही म्हटले होते,
कालच इरामच्या रिव्होल्युशनरी गार्डनी इराक आणि सीरियातील दहशतवादी तळांवरही क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.
पाकिस्तानमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यावरून पाकिस्तानने इराणच्या दूतावास प्रभारींना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात पाचारण केले आणि चांगले खडसावले. इराणने हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याबद्दल कडक शब्दात निषेध देखील करण्यात आला, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. इस्रायल आणि हमास दरम्यानच्या युद्धामुळे मध्यपूर्वेत असलेला तणाव इराणच्या हल्ल्यामुळे आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शरीफ यांच्याकडूनही इराणचा निषेध
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनीही इराणच्या या क्षेपणास्त्र हल्ल्याचा निषेध केला आहे. इराणचा हा हल्ला म्हणजे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावरील आणि मित्रत्वाच्या आत्म्यावरच हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांवरही विपरीत परिणाम होणार असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे.