पणजी : ‘द सिकेट लाईफ फ्रॉग्स’ बद्दल बोलताना अजय बेदी यांनी उभयचर प्राण्यांवरील हा पहिलाच भारतीय चित्रपट असल्याचे सांगितले. पश्चिम घाटात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून तो पूर्ण व्हायला तीन वर्ष लागल्याचे ते म्हणाले. आम्ही अनेक जातींचे चित्रीकरण केले पण नामशेष होण्याच्या मार्गावरील 6 ते 7 जाती आम्ही दाखवल्या आहेत. बेडूक शोधणे, मुसळधार पाऊस आदी आव्हानं होती. अत्याधुनिक कॅमेऱ्यांमुळे चित्रीकरण सोपं झाल्याचे त्यांनी सांगितले.
जंगलतोड, बेडकांची शिकार आदींमुळे बेडकांची संख्या कमी होत आहे, असे सांगून बेडूक हा पर्यावरणाचा मापदंड आहेत असे ते म्हणाले. बेडूकांवर परिणाम करणाऱ्या गोष्टी अंतिमत: माणसांवर परिणाम करतात असे त्यांनी स्पष्ट केले.
माहिती पटविषयी
अजय बेदी, विजय बेदी दिग्दर्शित या चित्रपटात जांभळ्या बेडकांसारख्या नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या आणि तात्काळ संरक्षण देण्याची गरज असलेल्या प्रजातींची कथा आहे. अजय आणि विनय बेदी हे द पॉलिसिंग, लंगूर आणि चेरब ऑफ द मिस्ट या चित्रपटांसाठी ग्रीन ऑस्कर पटकावणारे सर्वात तरुण आशियाई आहेत.