उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरेंची हजेरी ?

मुंबई : ठाकरे कुटुंबातील आनंदाच्या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना राज ठाकरे हजर राहण्याची चिन्हे आहेत. स्वतः उद्धव ठाकरे यांनी राज यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी फोन करुन निमंत्रण देणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शब्द उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता. ही वचनपूर्ती खुद्द उद्धव ठाकरे यांच्या रुपाने होणार आहे. कारण थेट शिवसेना पक्षप्रमुखच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार आहेत. सोबतच आदित्य ठाकरे यांचीही विधीमंडळात एन्ट्री झालेली आहे. ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीही निवडणूक लढवली नव्हती. पण आता आदित्य ठाकरेंना आमदारकी आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद असा दुहेरी आनंदाचा क्षण ठाकरे कुटुंबासाठी आहे. त्यामुळे या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज ठाकरे शिवाजी पार्क परिसरातच ‘कृष्णकुंज’मध्ये राहतात. त्यामुळे शपथविधीला ते पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि मातोश्री यांच्यासह उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याआधीही ठाकरे कुटुंबाच्या आनंदाच्या किंवा दुःखाच्या क्षणात राज यांनी साथ दिली आहे.

फारकत घेतल्यानंतर बाळासाहेबांचं निधन असो, किंवा उद्धव ठाकरे यांचे आजारपण, राज ठाकरे स्वतः हजर राहिले होते. तर राज यांचे पुत्र अमित ठाकरेंच्या लग्नालाही उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब हजेरी लावली होती. त्यामुळे दादाला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना ‘याचि देहि याचि डोळा’ पाहण्यासाठी राज ठाकरे उपस्थित राहू शकतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.