मुंबई – सुदीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून देशभरात वाद सुरू झाला होता. अजूनही चित्रपटाबाबत सोशल मीडियावर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच जगभरात शंभर कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि लवकरच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरही शंभर कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे.
आतापर्यंत द केरळ स्टोरीने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत आणि बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवले आहे. अनेक राज्यांमध्ये बंदी आणि चित्रपटाच्या विरोधात निषेध असूनही, ‘द केरळ स्टोरी’ आधीच बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. या चित्रपटाबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रया दिल्या आहेत.
दरम्यान, या बद्दल आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सामनामध्ये साप्ताहिक रोखठोक स्तंभात ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला भाजपचा प्रचार करणारा चित्रपट असल्याचं थेट म्हटले आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाचा दुसरा भाग हा ‘द केरळ स्टोरी’ असल्याचे सुद्धा राऊत यांनी म्हंटलं आहे.
भाजपाने कर्नाटक निवडणुकीपूर्वी हिंदू आणि मुस्लिमांचे ध्रुवीकरण करण्यासाठी द केरळ स्टोरी चित्रपटाचा वापर केल्याचे त्यांनी म्हटले असून ही चांगली गोष्ट नसल्याचे म्हटले आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट खरोखरच खऱ्या घटनेवर आधारित आहे का? हा देखील मोठा प्रश्न राऊतांची उपस्थित केलाय.
पुढे त्यांनी लिहिले की, खरोखरच केरळमध्ये हिंदू मुलींनी इस्लाम धर्म स्वीकारलाय? 32 हजार हिंदू आणि ईसाई मुली या ISIS मध्ये खरोखरच भर्ती झाल्या आहेत? द केरळ स्टोरी चित्रपटाचे निर्देशन हे सुदीप्तो सेन यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुदीप्तो सेन यांनी हा चित्रपटाच्या स्टोरीवर सात वर्ष काम केले असून सर्व कागदपत्रे असल्याचा देखील दावा केला.