नवी दिल्ली – आयपीएलच्या 2023 चा 60व्या सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर असा रंगणार आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेतला आहे. अशातच आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली याने मैदानात उतरताच विश्वविक्रम केला आहे.
T20 क्रिकेटमध्ये एका संघासाठी 250 सामने खेळणारा कोहली जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. आयपीएल 2008 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून विराट कोहली आरसीबीचा भाग आहे. त्याने आरसीबीसाठी आयपीएलमध्ये 235 सामने आणि चॅम्पियन्स लीग टी-20 मध्ये 15 सामने खेळले आहेत.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी T20 क्रिकेटमध्ये संघासाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत चेन्नईसाठी 240 सामने खेळले आहेत. त्याचबरोबर अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड चौथ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स (MI) साठी 211 सामन्यांत पोलार्ड मैदानावर उतरला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम करणाऱ्या कोहलीने अलीकडेच आयपीएलमध्ये सात हजार धावा केल्या आहेत. आयपीएल मध्ये सात हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्यापाठोपाठ पंजाब किंग्जचा शिखर धवन (6599) आणि दिल्ली कॅपिटल्सचा (DC) डेव्हिड वॉर्नर (6265) यांचा क्रमांक लागतो. तसेच कोहलीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 50 अर्धशतके आणि 5 शतके झळकावली आहेत.