मुंबई – आम आदमी पक्षाच्या सरकारचा ब्रॅंड ऍम्बॅसिडर बनलेले अभिनेते सोनू सूद यांच्या विरोधातील आयकर विभागाच्या कारवाईची व्याप्ती आता वाढली आहे. सूद यांच्याशी संबंधीत अनेक ठिकाणांवर आयकर खात्याने शुक्रवारी छापेमारी केली.
बुधवारी त्यांच्या ठिकाणांचा सर्व्हे करण्यात आला होता व त्यांच्याशी संबंधीत लोकांची चौकशी करण्यात आली होती. सूद यांच्याशी संबंधीत मुंबई, दिल्ली आणि लखनौ या ठिकाणांवर जाऊन आयकर अधिकाऱ्यांनी तेथील कागदपत्रांची तपासणीही केली होती.
सोनू सूद यांनी अलिकडच्या काळात केलेले काही खरेदी व्यवहार तसेच जमीनींचे व्यवहारही तपासले जात आहेत. सोनू सूद हे गरीबांना व गरजुंना मदत करणारे अभिनेते म्हणून ख्यातकिर्त आहेत.सूद यांच्यामुळे मदत मिळालेले लाखो लोक आज त्यांच्या या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे आहेत असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
शिवसेनेने केला निषेध
पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात हा आरोप करण्यात आला आहे. स्वत:ला जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाला काही बाबतीत आपले मनही मोठे करायला हवे आहे अशी सूचनाही शिवसेनेने भाजपला केली आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवरील खोट्या कारवाया, बारा आमदारांची नेमणूक राज्यपालांमार्फत रोखून धरणे, सोनू सूद यांच्या सारख्यांवर आयकराचे छापे टाकणे हे कोत्या मनोवृत्तीचे लक्षण आहे असेही सेनेने म्हटले आहे.
सोनू सूदने पहिल्या लॉकडाऊनच्या काळात शेकडो स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी नेऊन सोडण्याची मोठी कामगिरी पार पाडली. आणि त्यावेळी भाजपने सोनू सूद यांचे कौतुक करून महाविकास आघाडीवर टीका केली होती. जे सोनू सूद करू शकतो ते महाविकास आघाडी का करू शकत नाही असा सवाल भाजपने केला होता.
पण आज जेव्हा सोनू सूद हे केजरीवाल सरकारसाठी ब्रॅंड ऍम्बॅसिडर बनले त्यावेळी लगेच भाजपला ते डाचायला लागले अशी टिप्पणीही सेनेने केली आहे. जे लोक भाजप विरोधी गटांशी जोडले जातात त्यांच्यावर लगेच कारवाई करणे ही भाजपची रितच झाली आहे असेही शिवसेनेने म्हटले आहे.