नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर कोसळल्यानंतर भारतीय बाजारातील सोन्याच्या दरात मोठी घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 1,130 रुपयांनी कोसळून 45,207 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 708 रुपयांनी कोसळून 60,183 रुपये प्रति किलो झाला.
काल जागतिक बाजारात सोन्याचे दर कोसळल्यानंतर आज जागतिक बाजारामध्ये सोन्याच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली होती. मात्र तरीही भारतीय बाजारात सोन्याच्या दर कोसळल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
जागतिक बाजारात सध्या सोन्याचा दर 1,762 डॉलर तर चांदीचा दर 22.95 डॉलर प्रति औस या पातळीवर आहेत. सध्या जागतिक आणि देशातील बाजारामध्ये सोन्याचे दर एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर आहेत. अमेरिकेतील रोजगार निर्मिती वाढली आहे. त्याचबरोबर किरकोळ विक्री वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारल्याचे संकेत मिळत आहे. डॉलरही वधारत असल्यामुळे सोन्याचे दर कमी होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.