वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन हे उद्या जपानचे पंतप्रधान फुमिओ कीशीदा यांच्याशी व्हिडीओ कॉलवर चर्चा करणार आहेत. अमेरिकेचा रशियाबरोबरचा तणाव सध्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे महत्व दिले जात आहे. त्यांच्या चर्चेत इंडो-पॅसिफिक तसेच अन्य जगात शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवण्याच्या मुद्द्याचा समावेश असेल.
सध्या युक्रेनच्या विषयावरून अमेरिका आणि रशियात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युक्रेन मध्ये आक्रमण करून हा प्रदेश ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठा दबाव आल्यानंतरही रशियाने आपला इरादा बदलेला नाही, त्यामुळे येत्या काहीं दिवसांत बाका प्रसंग उद्भवू शकतो असे सांगितले जात आहे.
या चर्चेत कोविड नियंत्रणाच्या विषयाचाही समावेश असणार आहे. अमेरिका आणि जपान यांच्यात महत्वाची भागीदारी असून ती सध्याच्या काळात आणखी भक्कम करण्यावरही या चर्चेत भर असेल असे सांगितले जात आहे.