पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सत्राचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार दुसरे सत्र अभ्यासक्रमनिहाय दि. 15 जून ते 20 ऑगस्ट या कालावधीत संपणार आहे. त्यातच यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेस विलंब झाला आहे. त्यामुळे जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत दुसऱ्या सत्राची परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट आहे.
पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांची दुसरी सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने यापूर्वीच घेतला आहे. या परीक्षा जून महिन्यात घेण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, दुसरे सत्राचे शैक्षणिक वेळापत्रक तयार करताना किमान 90 दिवसांचा कालावधी अध्यापनासाठी दिला आहे.
त्यात अभ्यासक्रम सर्व शिकवून पूर्ण होणे अपेक्षित आहे. करोनामुळे दोन वर्षे विद्यापीठ व महाविद्यालयातील शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र दोन-तीन महिने पुढे गेले. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. राज्य सरकारने सर्व निर्बंध उठविले आहेत. विद्यापीठाच्या पहिल्या सत्राची परीक्षा पूर्ण होत असून,
आता दुसऱ्या सत्राची परीक्षा ऑफलाइन असल्याने त्याची तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे. यासंदर्भात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर म्हणाले, दुसऱ्या सत्राचे शैक्षणिक वेळात्रक प्रसिद्ध झाले असले तरी बहुतांश प्राध्यापकांनी त्यापूर्वीच
अध्यापनास सुरुवात केली आहे. त्यामुळे वेळेपूर्वीच बहुतांश अभ्यासक्रम शिकवून पूर्ण होतील. मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेशास उशिर झाला आहे. जी अभ्यासक्रमे शिकवून पूर्ण होतील, त्याची परीक्षा आधी घेण्याचे नियोजन आहे.