पुणे : राज्य सरकारने प्रलंबित ठेवलेल्या भरती प्रक्रिये विरोधात ऑनलाईन आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनास राज्यभरातील तरुणांनी प्रतिसाद देत सुमारे दीड लाखांहून अधिक ट्विट केले आहेत. यानंतरही राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने येत्या 26 जुलैपासून घरात बसून आंदोलन करण्याचा निर्णय पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने घेतला आहे.
राज्यभरातील लाखो तरुण सध्या प्रलंबित भरती प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावी या प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकारला वारंवार निवेदन देऊन देखील राज्य सरकरला जाग येत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे “मनविसे’चे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलीस भरती, शिक्षक भरती, सरळ सेवा भरती, आरोग्य भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संबंधित अनेक प्रश्नांवर या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यसरकारला जाग येण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.
आंदोलनात प्रलंबित शिक्षक भरतीची पुढील निवड यादी जाहीर करा, रखडलेली पोलीस भरती तात्काळ सुरू करा, आरोग्य विभाग भरती त्वरित करा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करा, या सर्व मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी लवकरच भेट घेणार आहे. ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे यादव यांनी म्हटले आहे