मुंबई: पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची घोषणा आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. केंद्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी पंकजा मुंडेंना दिली जाईल. तसेच विधानसभेत मुख्य प्रतोद हे आशिष शेलार, माधुरी मिसाळ असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या राज्य कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. ही घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. दर तीन वर्षानी स्थानिक पातळी ते राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल होतात. गेल्या काही दिवसांमध्ये पक्षात अनेक नेते नाराज होते. त्यामुळे ही कार्यकारिणी कशी असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पंकजा मुंडेंना केंद्रात कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळेल, कोअर कमिटीच्या सदस्या त्या 100 टक्के असतील. केंद्रातली जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल.
तसेच प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या दोन वेगळ्या खासदार आहेत. त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजाताई नाराज आहेत म्हणून त्यांना ही जबाबदारी दिली असं काहीही नाही. आमच्या पक्षात कुणीही नाराज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
करोना संकटामुळे भाजपाची कार्याकारिणी जाहीर करायची राहिली होती. कोणतीही घोषणा सगळ्यांशई बोलून, सगळ्यांना बरोबर घेऊन करायची असते, त्यामुळे थोडा वेळ लागला. माझ्याबरोबर 12 प्रदेश उपाध्यक्ष आहेत. पाच सेक्रेटरी म्हणजेच सरचिटणीस आहेत. त्याशिवाय एक महामंत्री संघटन म्हणजे सरचिटणीस संघटन असे सहा सरचिटणीस आहेत. एक खजिनदार आणि 12 सरचिटणीस आहेत.
भाजपाची कार्यकारिणी
महामंत्री – सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक
उपाध्यक्ष – राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हळवणकर, प्रितम मुंडे, चित्रा वाघ, प्रसाद लाड, भारती पवरा, जयप्रकाश ठाकूर