बांगलादेश – बांगलादेशमध्ये बसचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. शनिवारी एक बस थेट तलावात पडल्याने तीन मुलांसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बांगलादेशमधील झालाकाठी सदरमधील छत्रकांडा भागात ही घटना घडली आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती समोर येत आहे.
या अपघातात मृत झालेले लोक हे पिरोजपूरच्या भंडारिया उपजिल्हा आणि झलकाठीच्या राजापूर भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही बस पिरोजपूर येथील भंडारिया येथून सकाळी 9 वाजता निघाली होती. त्यानंतर बस बारिशाल-खुलना महामार्गावरील छत्रकांडा येथे सकाळी 10 वाजता येताच रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात पडली आणि हा अपघात झाला.
‘या बसचा चालक वाहकाशी बोलत होता त्यावेळी अचानक बस रस्त्यावरून खाली गेली आणि तळ्यात पडली. तसेच बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने तळ्यात पडल्यानंतर बस पाण्यात बुडाली. मात्र मी बसमधून बाहेर पडण्यास यशस्वी झालो आणि माझे प्राण वाचले,’ असे बसमधील एका प्रवाशाने सांगितले आहे.