कोथरूड – चांदणी चौकात नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. या पुलावरील पहिल्या लेनचे (मार्ग) काम पूर्ण झाले आहे. अन्य लेनचे कामही वेगाने सुरू आहे. या उड्डाणपुलामुळे चौकातील कोंडी फुटणार असून एनडीए-पाषाण-बावधन-कोथरूड-मुळशी हे मार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत.
नवीन उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त 12 ऑगस्ट ठरलेला आहे. त्यामुळे उद्घाटनाला अवघे 20 दिवस राहिले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली असून, सर्व कामगार याचठिकाणी दिवस-रात्र काम करीत आहे. या उड्डाणपुलामुळे कोथरूड, एनडीएकडून बावधन आणि पाषाणला आणि मुळशीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे महामार्गासह सर्व्हिस रस्त्यावर होणारी कोंडीही सुटण्यास मदत होणार आहे.
उड्डाणपूल नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे उभारण्यात येत आहे. त्यामध्ये गर्डर टाकून त्यावर स्लॅप टाकण्यात आला आहे. त्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुभाजक आणि रस्त्याचे अंतीम फिनिशिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलासाठी लागणार वेळ कमी झाला आणि कामही दर्जेदार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
15 दिवसांत काम…
चौकातील सध्या एक लेन (मार्ग) तयार झाली असून बावधनकडून एनडीए आणि मुंबईला जाणाऱ्या वाहनांसाठी ही लेन असणार आहे. तसेच कोथरूड आणि एनडीएकडून बावधन तसेच मुळशीकडे जाणाऱ्या लेनचे कामही 50 टक्के झाले आहे. उर्वरीत लेनचे काम येत्या 15 दिवसांत पूर्ण होणे अपेक्षीत आहे. हे वेळापत्रक साधले गेले तरच उद्घाटनाचा मुहुर्त गाठता येणार आहे.