सत्ताधारी भाजप नगरसेवकांना अधिकारीच जुमानत नसल्याचे स्पष्ट
कोंडलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सहशहर, कार्यकारी अभियंत्याचा समावेश
आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर अधिकाऱ्यांना सोडले; कासारवाडीतील प्रकार
पिंपरी (प्रतिनिधी) – सत्ताधारी भाजप नगरसेवकांना महापालिकेचे अधिकारीच जुमानत नसल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले. चार दिवसांपासून कासारवाडी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने संतापलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेने पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंत्यांसह पाच अधिकाऱ्यांना कासारवाडी येथील पाण्याच्या टाकीखालील खोलीत तब्बल चार तास कोंडून ठेवले. अखेर आयुक्तांनी मध्यस्थी केल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास या अधिकाऱ्यांना सोडून देण्यात आले.
सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रविण लडकत, उपअभियंता शशिकांत दवंडे आणि कनिष्ठ अभियंता किरण अलदूरे अशी कोंडून ठेवलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. कासारवाडी, दापोडी भागातील पाणापुरवठा गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत आहे. चार दिवसांपासून विस्कळीत असलेला पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले होते. त्यातच दोन दिवसांपासून पाणीपुरठाच न झाल्याने रहिवाशांच्या संतापाचा अनावर झाला. पिण्यापुरते देखील पाणी मिळत नसल्याने रहिवाशांनी थेट भाजपच्या स्थानिक नगरसेविका आशा शेंडगे यांच्याकडे धाव घेतली.
रहिवाशांची समस्या जाणून घेऊन शेंडगे यांनी त्वरीत संबधित अधिकाऱ्यांना कासारवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ बोलावून घेतले. घटनास्थळी आलेल्या अधिकाऱ्यांना विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत समाधानकारक उत्तर देता न आल्याने नगरसेविका आशा शेंडगे यांनी पाचही अधिकाऱ्यांना पाण्याच्या टाकीखालील खोलीत कोंडून ठेवले. जोपर्यंत पाण्याची टाकी भरत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांना बाहेर सोडणार नाही, अशी भूमिका शेंडगे यांनी घेतली. अखेर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नगरसेविका शेंडगे यांच्याशी संपर्क साधला. सांयकाळी सहापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास पाचही अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली.
पाणीपुरवठ्याच्या कामासाठी कासारवाडी भागातील पाण्याचे शटडाऊन घेण्यात आले होते. त्यामुळे कासारवाडीचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. यामुळे नागरिकांचा उद्रेक झाला. सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी – चिंचवड महापालिका