दुरावस्था पाहून कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त : आरोग्याधिकारी डॉ. बोरगे यांना निलंबित करण्याची मागणी
नगर – सर्वसामान्यांना अत्यल्प दरात रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महापालिकेच्या रक्तपेढीची दुरावस्था पाहून भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. रक्तपेढीचे प्रमुख केवळ स्वाक्षरी करण्यापुरतेच उपस्थित राहत असून लाखो रुपयांच्या नव्या मशिनरी धुळखात पडल्या आहेत. रुग्णांना येथे रक्त मिळत नसल्याने आज ही रक्तपेढी केवळ नावालाच राहिली आहे. त्याला महापालिका जबाबदार असून आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केली आहे.
महापालिकेने सुरु केलेल्या रक्तपेढीचे उद्घाटन 1986 साली भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाले होते. त्यामुळे या रक्तपेढीप्रती सर्व भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनात आपुलकी आहे. मात्र आज या रक्तपेढीची झालेली दुरावस्था पाहून संताप व्यक्त करण्यात आला. डॉ. शंकर शेडाळे हे केवळ रजिस्टरवर सह्या करण्यापुरतेच रक्तपेढीप्रमुख राहिले आहेत. डॉक्टरांच्या पूर्ण दुर्लक्षामुळे, कर्मचाऱ्यांच्या अभावी, येथे लाखो रुपयांच्या नव्या मशिनरी धूळखात पडल्या आहेत.
एखादा रक्त देण्यासाठी आला तर त्याचे रक्त घेण्यासाठी येथे साहित्य नाही, टेक्निशियन नाही, लिपिक नाही, अशा असुविधा असल्याने ही रक्तपेढी केवळ नावापुरतीच राहीली नाही. शहरातील खासगी रक्तपेढ्यांमध्ये 1 हजार 500 ते 2 हजार रुपयांपर्यंत रुग्णांना रक्त मिळते, मात्र मनपाच्या या रक्तपेढीमधून केवळ 500 रुपयांत सर्वसामान्य रुग्णांना रक्त मिळत असे. आज मात्र या रक्तपेढीत रक्ताची एकही पिशवी नसल्याची ही बाब अत्यंत संतापजनक आहे.
महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालय येथे असलेल्या रक्तपेढीची दुरावस्था झाली आहे. तेथे रक्ताचा एकही थेंब उपलब्ध नाही, हे कळल्यावर लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने रक्तपेढीला अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी तेथे केवळ दोनच कंत्राटी कर्मचारी होते. एकही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी रक्तपेढीत नव्हते. रक्तपेढीचे प्रमुख डॉ.शंकर शेडाळे यांना वसंत लोढा यांनी भ्रमणदूरध्वनीवरुन संपर्क साधला असता, त्यांनी आजारी असल्याने केवळ सही करुन घरी आलो आहे, असे सांगून उडवा-उडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे संतापलेले लोढा यांनी डॉ.शेडाळे यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी भाजपचे अनिल गट्टाणी, महावीर कांकरिया, केडगांव मंडल अध्यक्ष पंकज जहागिरदार, हरिभाऊ डोळसे, महेश नामदे, तुषार पोटे, सुहास पाथरकर, विकी सुपेकर आदि उपस्थित होते.आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे वारंवारपत्र व्यवहार करुन रक्तपेढीसाठी कर्मचारी व साहित्यांची मागणी केली; मात्र डॉ. बोरगे यांनी या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. सर्वसामान्य नागरिकांना आधार असलेल्या या रक्तपेढीच्या दुरावस्थेला डॉ. बोरगे हेच जबाबदार आहेत. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेवून ही रक्तपेढी पुन्हा सुरु करण्यासाठी उपाययोजना राबविण्याबरोबर डॉ. बोरगे यांना निलंबित करण्याची मागणी करणार आहोत.