अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा पती गजाआड

“विमेन हेल्पलाइन’ची महत्त्वपूर्ण भूमिका; ठिकाण बदलूनही कारवाई झालीच
पिंपरी (प्रतिनिधी) – नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा 24 वर्षीय तरुणाशी विवाह लावून देण्यात येणार असल्याची कुणकूण सामाजिक संघटनांना लागली. हे लग्न उधळून लावण्याची तयारी त्यांनी केली. मात्र याची चाहूल दोन्ही कुटूंबियांना लागल्याने ऐनवेळी लग्नाचे स्थळ बदलून विवाह आटोपला. विमेन हेल्पलाइनने बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेमुळे लग्नानंतर नवरदेवास अटक करण्यात आली आहे. ही घटना लोणीकंदजवळ घडली.

महिलांसाठी काम करणाऱ्या वुमन हेल्पलाइनला शुक्रवारी (दि. 31) सकाळी अनोळखी व्यक्‍तीने फोन करून आळंदीत होणाऱ्या बालविवाहाची माहिती दिली. अध्यक्षा नीता परदेशी यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आळंदी गाठले. प्रत्येक मंगल कार्यालयात शोध घेतल्यानंतरही कोणताच सुगावा न लागल्याने त्यांनी आळंदी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण मदतीचे आश्‍वासन दिले. तांत्रिक महितीच्या आधारे नातेवाईकांची माहिती मिळविली. सामाजिक संस्थांना बालविवाहाची कुणकूण लागल्याचे समजताच मुलीच्या नातेवाइकांनी ऐनवेळी लग्न आळंदी ऐवजी लोणीकंदला उरकले.

ही माहिती समजताच वूमन हेल्पलाईनच्या महिला कार्यकर्त्यांनी लोणीकंदजवळील भुर्के गावात धाव घेतली. तोपर्यंत विवाह आटोपून मुलीचे नातेवाईक मुंबईला गेले होते. मात्र, महिला कार्यकर्त्यांनी खंबीर भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे नवरदेव विद्याधर भगवान ब्रह्माणे (वय 24) याच्यासह इतर नातेवाइकांना लोणीकंद पोलिसांनी रात्री 8 च्या सुमारास बालविवाह प्रकरणी अटक केली. पीडित मुलीला पोलिसांनी सामाजिक संस्थेकडे सुपूर्द केले. या कारवाईमध्ये वुमन हेल्पलाइनच्या कृष्ण कुंदनानी, ऍड. मोनिका पिसाळ, ऍड. संकल्पा वाघमारे, क्रांती कदम, सारिका परदेशी यांनी सहभाग घेतला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.