‘या’ सहा राज्यांतून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ‘आरटी-पीसीआर’ चाचणी बंधनकारक

पुणे – राज्य शासनाकडून सहा राज्यांतून रेल्वेने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना “आरटी-पीसीआर’ चाचणी बंधनकारक केली आहे. याचा निगेटिव्ह अहवाल नसणाऱ्यांची स्थानकातच रॅपिड ऍन्टिजेन चाचणी होणार आहे. याबाबत स्थानिक प्रशासन आणि रेल्वे प्रशासनामध्ये समन्वय साधण्यात येत आहे.

केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड या राज्यांतून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना 48 तासांपूर्वी करोनाची “आरटी-पीसीआर’ चाचणी करणे बंधनकारक केले आहे. पुणे स्टेशन येथे दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात.

सध्या केवळ विशेष गाड्या धावत असल्याने ही संख्या काही अंशी कमी आहे. गुजरात, राजस्थान, दिल्ली, गोवा या राज्यांतून दररोज, द्विसाप्ताहिक आणि साप्ताहिक अशा सुमारे 20 गाड्या ये-जा करतात. प्रतिबंधित राज्यांपैकी केरळ आणि उत्तराखंड या राज्यांतून पुणे येथे थेट गाड्या ये-जा करत नाहीत.

तर, गोवा आणि दिल्लीच्या काही गाड्या पुणे स्थानकामार्गे धावतात. त्यामुळे या गाड्यांतून सुमारे 150 प्रवासी पुणे येथे उतरतात. तर, या राज्यांतून येणाऱ्या आणि पुणे येथे अंतिम थांबा असणाऱ्या गाड्यांतून सुमारे 400 प्रवासी उतरतात.

चाचण्यांबाबतचे व्यवस्थापन आणि अंमलबजावणी राज्य शासनाकडून करण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून संबंधित व्यवस्थांशी संपर्क साधण्यात येत असून, चर्चा सुरू आहे. रेल्वे कर्मचारी, आवश्‍यक जागा आणि गाड्यांबाबतची माहिती आदी उपलब्ध करून देण्याबाबत समन्वय साधण्यात येईल.
– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.