उदयनराजे भोसले यांनी केले भवानी तलवारीचे पूजन
सातारा – मंगळवारी शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा झाला. पोवईनाका येथे ऐतिहासिक भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. तसेच सार्वजनिक मंडळांच्या देवींचे विसर्जन करण्यात आले.
सायंकाळी जलमंदिरात माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राजघराण्याच्या भवानी तलवारीचे पूजन केले. यावेळी राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले, छत्रपती दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, माजी जि. प. शिक्षण सभापती सुनील काटकर आदी उपस्थित होते.
तलवारीचे पूजन केल्यावर भवानी तलवार फुलांनी सजवलेल्या पारंपरिक लाकडी पालखीत ठेवून मिरवणुकीने पोवई नाका येथील पूजनाच्या ठिकाणापर्यंत आणण्यात आली. गाववेशीच्या बाहेर सीमोल्लंघन करण्यात आले. मिरवणुकीच्या अग्रभागी सनई-चौघडा, शिंग-तुताऱ्यांचा समूह, राजघराण्यातील मानकरी, नऊवारी साडी नेसलेल्या मुली, तसेच फेटाधारी युवक होते. या मिरवणुकीसाठी साताऱ्यात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
विसर्जन मिरवणूक व शाही दसऱ्याची मिरवणूक व आकर्षक आतषबाजी यामुळे राजवाडा परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. राजपथावरून ही मिरवणूक पोवईनाक्यावर आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या तलवारीचे पंचोपचारपूजन उदयनराजे भोसले यांनी केले. वेदमूर्ती उपेंद्रशास्त्री धांदरफळे यांनी पौरोहित्य केले. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळांच्या देवींचे विसर्जन कृत्रिम तळ्यात करण्यात आले. अनेक मुख्य रस्ते मिरवणुकीमुळे बंद करण्यात आले होते.