खेडच्या पूर्व भागातील दुष्काळास आजी-माजी आमदार जबाबदार

वरुडे येथील कार्यक्रमात अतुल देशमुख यांची टीका

राजगुरूनगर – खेड तालुक्‍यातील पूर्व भागाच्या दुष्काळी संकटाला आजी-माजी आमदार जबाबदार असल्याचे प्रतिपादन अतुल देशमुख यांनी वरुडे (ता. खेड) येथे केले

खेड-आळंदी विधानसभेचे अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्या प्रचारार्थ वरुडे येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी शरद बुट्टेपाटील, अमोल पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य दादाभाऊ पारधी, कैलास गाळव, सर्जेराव पिंगळे, बाळासाहेब शिंदे, बापू दौंडकर, गणेश सांडभोर, दिलीप माशेरे, अतुल कानडे, रघुनाथ लांडगे, अशोक नाईकरे यांच्यासह तालुक्‍याच्या पूर्व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतुल देशमुख म्हणले की, गेल्या 15 ते 20 वर्षांपासून खेड तालुक्‍यातील पूर्व भागातील शेतकरी पाण्यासाठी व्याकुळ आहेत. मग तुमच्या मताच्या आधारे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी काय करीत होते, असा प्रश्‍न त्यांना विचारण्याची आता वेळ आली आहे. हेच लोकप्रतिनिधी लोक हिताच्या निर्णयापेक्षा पक्षाच्या नेत्याच्या हिताचा विचार करत आहे. कारण पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बोलले तर पुढील काळात निवडणुकीत तिकीट मिळणार नाही, या भीतीमुळे लोकप्रतिनिधी आजपर्यंत गप्प राहिल्याने खेड तालुक्‍यातील पूर्व भाग आजपर्यंत दुष्काळाने वेढला, असे स्पष्ट करून देशमुख यांनी आजी-माजी आमदारांना लक्ष्य करीत टीका केली.

भामा-आसखेड धरणातून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांना चाललेले पाणी विद्यमान आमदार थांबवू शकले नाहीत आणि खेड तालुक्‍यातील पूर्व भागाला लागणारे पाणी आजी-माजी आमदार देऊ शकले नाहीत, हे त्यांचे अपयश असून तालुक्‍यात विकास करू शकले नाही, असे अतुल देशमुख यांनी स्पष्ट केले. यावेळी अमोल पवार, शरद बुट्टे पाटील, कैलास गाळव आदीने मनोगत व्यक्‍त केले.

… मात्र रोजगार मिळाला नाही
खेड तालुक्‍यातील पूर्व भागात “सेझ’ उभारले, यामध्ये अनेक कंपन्या उभ्या राहिल्या व रोजगार उपलब्ध होईल, ही अशा डोळ्यासमोर ठेवून पूर्व भागातील तरुण वाट पाहत होता. जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्या; मात्र रोजगार काही मिळाला नाही आणि दुष्काळी संकटात असणारा या भागातील तरुण आजही बेरोजगारीतच आपले आयुष्य काढत आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष देत नाही, ही वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे, असे अतुल देशमुख यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.