राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब

अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मानले आभार

आठवडाभरात नवीन अध्यक्ष मिळणार

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे पण तो स्वीकारला गेला नसल्याने त्याविषयी शंकाकुशंका उपस्थित केल्या जात होत्या. तथापी आज स्वता राहुल गांधी यांनीच कॉंग्रेसच्या कार्यकारीणीला शक्‍यतितक्‍या लवकर बैठक बोलावून नवीन अध्यक्ष निवडण्याची सुचना केली असून पक्षाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. येत्या आठवडाभरात पक्षाला आता नवीन अध्यक्ष मिळणार असल्याची माहिती पक्षाच्या काही सूत्रांनी काही वृत्तवाहिन्यांना दिली आहे.

कॉंग्रेस कार्यकारीणीला लिहीलेल्या पत्रात राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आपल्या या महान देशाच्या जीवनमुल्यांशी जोडल्या गेलेल्या पक्षाच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी या पक्षाचा आभारी आहे. हा माझ्यासाठी एक सन्मान होता. माझ्यावर माझ्या देशाच्या आणि पक्षाच्या प्रेमाचे मोठे कर्ज आहे. त्यांचे हे पत्र म्हणजेच त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाचे शिक्कामोर्तबच मानले जात आहे. तत्पुर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्षाच्या कार्यकारीणीने आता शक्‍य तितक्‍या लवकर एक बैठक घेऊन नवीन अध्यक्ष निवडावा अशी सुचना त्यांनी केली.

पक्षाच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीच्या प्रक्रियेत मी कोठेही नाही. ही प्रक्रिया पक्षाच्या कार्यकारीणीनेच पार पाडली पाहिजे असे प्रतिपादनही त्यांनी केले. पक्षाचे अध्यक्षपद आपण सोडत असलो तरी आपण पक्षासाठी कार्यरतच राहु असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या अनेक नेत्यांनी गेले पंधरा दिवस त्यांचे मन वळवण्याचा सतत प्रयत्न केला परंतु ते आपल्या राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठामच राहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.