भंडारदऱ्यापाठोपाठ “निळवंडे’ही भरले

अकोले -भंडारदरा धरणापाठोपाठ निळवंडे धरणही आज दुपारी 3 वाजता तांत्रिकदृष्ट्‌या भरले. धरण तांत्रिकदृष्ट्‌या भरल्यानंतर धरणातून सायंकाळी 7 वाजता 10 हजार 856 क्‍युसेक्‍सचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

दरम्यान, जलसंपदा जलाशय परिवलन सूचिनुसार आगामी काळातील पावसामुळे धरणात जमा होणारे पाणी नियंत्रण ठेवण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत धरणामध्ये 94 टक्‍के पाणीसाठा नियंत्रणात ठेवला जाणार आहे. अधिकचे पाणी प्रवरा नदी पात्रात सोडले जाणार असून निळवंडे धरण 100 टक्‍के भरल्याचे 15 ऑक्‍टोबरला सूचीनुसार घोषित केले जाईल, अशी माहिती शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.

भंडारदरा धरण पाणलोटात धुवाधार पावसाची बॅटिंग सुरूच आहे. मुळा धरणाच्या पाणलोटातही पाऊस सुरु असून तालुक्‍यातील रतनवाडी येथे आज अतिवृष्टीची नोंद झाली आहे. इतर ठिकाणीही पाच ते सहा इंच पावसाची नोंद झाली आहे. निळवंडे धरण आज दुपारी तांत्रिकदृष्ट्‌या भरले. त्यामुळे दुपारी तीन वाजल्यापासून या धरणातून 10 हजार 856 क्‍युसेक्‍स विसर्ग प्रवरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.

धरणात जमा होणाऱ्या अधिकच्या पाण्यामुळे प्रवरा नदीपात्रात विसर्ग वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी आपापली नदीकाठचे कृषीपंप किंवा अन्य साधनसामुग्री सुरक्षित ठिकाणी हलवावीत. नदीला नजीकच्या काळात पूर येणार असल्याने नागरी परिसरातील नदीकाठच्या गावांनी सुरक्षितस्थळी आपला मुक्काम हलवावा. पूर पाहण्यासाठी पुलावर गर्दी करू नये. पाण्यात उतरू नये. जुन्या इमारतीत राहू नये आणि अडचण आल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जलसंपदाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर व नगर पंचायतचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी केले.

काल व आज भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्राला वरूण राजाने झोडपून काढले. भंडारदरा धरण शंभर टक्के भरल्याने या धरणाचा अधिकचा विसर्ग स्पिलवे वाटे, अम्ब्रेला फॉल वाटे आणि विद्युत गृह क्रमांक एक व दोन द्वारे प्रवरा नदीपात्रात सोडला जात आहे. निळवंडे धरणाची साठवण क्षमता 8 हजार 200 दशलक्ष घनफूट असून या धरणात आज सकाळी 7 हजार 486 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होता. सकाळी हे धरण 90 टक्के भरले होते. तर सायंकाळी 7 वाजता या धरणाचा पाणीसाठा 7 हजार 843 दशलक्ष घनफूट इतका झाला.

परिवलन सूचीनुसार हे पाणी अधिक झाल्याने व तांत्रिकदृष्ट्‌या भरण्याने व संभाव्य पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन आणि पाणी पातळीचे संतुलन राखण्यासाठी या धरणातून विसर्ग सुरू झाला आहे.

आज सकाळी मुळा धरणांमध्ये 22 हजार 914 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला होता. या धरणात नवीन 817 दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले आहे. हा साठा 88 टक्के इतका झाला आहे. तर आढळा धरणामध्ये 623 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला असून या धरणात नवीन एकूण 59 दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले. हे धरण 59 टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोटात आणि इतर ठिकाणी झालेली पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- घाटघर-134, रतनवाडी- 195, पांजरे- 135, वाकी- 123, भंडारदरा- 133, निळवंडे- 44, आढळा- 2, कोतुळ -2, अकोले- 32.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.