दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त प्रातिनिधीक यात्रा साधेपणाने
भुलेश्वर(प्रतिनिधी ) – माळशिरस (ता. पुरंदर) येथील भुलेश्वर महादेवाची श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारची प्रातिनिधीक यात्रा शांततेत पार पडली. यावेळी गाभाऱ्यामध्ये विविध प्रकारची फुले व मिठाईचा वापर करून आकर्षक सजावट तर गाभाऱ्या समोर मंडपात फुलांचा आकर्षक गालीचा तयार करण्यात आला होता.
दरवर्षी मध्यरात्री 12 वाजल्यापासून या ठिकाणी भक्तांची रांग लागलेली असते; मात्र यावर्षी करोनामुळे मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने पहाटे तीन वाजता पुजारी मंडळाच्या वतीने रुद्राभिषेक करून पहाटे पाच महाआरती करण्यात आली. तर पुजारी व माळशिरस ग्रामपंचायत सदस्या रुपाली गुरव यांनी गाभाऱ्यासमोर मंडपात फुलांनी आकर्षक गालीचा तयार केला होता.
प्रत्येक सोमवारी होणाऱ्या प्रातिनिधीक यात्रेमध्ये वेगवेगळ्या लोकांचा सहभाग असणार आहे. या वर्षी करोनामुळे जी परिस्थिती ओढावाली आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तरी भक्तांनी सामंजस्य दाखवून प्रशासनाला सहकार्य करावे.
– महादेव बोरावके, सरपंच, माळशिरस
दुपारी 12 वाजता “श्रीं’ची मूर्ती वाजत-गाजत पाण्याच्या कुंडवर नेऊन स्नान घालण्यात आले. त्यानंतर श्रींची मूर्ती हातात घेवून पुन्हा वाजत गाजत “सदाशिव शंकर त्रीनयना, शिवाला वाहू बेल दवणा’ आशा पारंपरिक भजनाच्या मंजुळ स्वरात मंदिराकडे नेण्यात आली. दुपारी एक वाजता प्रवेशद्वारावर मानाच्या लहान कावडीने प्रातिनिधीक स्वरुपात धार घालण्यात आली. यावेळी उपस्थित मोजक्या भाविकांनी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करीत मास्क व सॅनिटायझरचा वापर केला.