मुंबई – शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलात वास्तव्याला आहेत. त्यांच्या तेथील मुक्कामाचे बिल अद्याप कोणी भरले आहे की नाही याची माहिती अजून पुढे आलेली नाही, पण हे आमदार येथे येण्या आधी सुरतच्या हॉटेलात मुक्कामाला होते तेथील हॉटेलचे बिल मात्र थकवण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनीच हे हॉटेल बुक केले होते अशी माहिती मिळाली आहे असे वृत्त एका संकेत स्थळावर देण्यात आली आहे. त्यासाठी ए, बी आणि एबी अशी नावे वापरून सूरत मधील हॉटेल बुक करण्यात आले होते. बुकींग करणाऱ्याचे किंवा तेथे राहणाऱ्यांचे पत्ते किंवा ओळखपत्रे घेण्याची पद्धत आहे, पण तेही या हॉटेलात झालेले नाही.
हे आमदार येथे येऊन राहिले आणि नंतर ते गुवाहाटीला गेले. पण त्यांच्या सूरत येथील मुक्कामाची व खाण्यापिण्याची बिले अजून कोणीही भरलेली नाहीत अशी माहिती मिळाली आहे.