नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बंगळुरूमध्ये रविावारपासून होणारी बैठक कोरोना विषाणूंच्या साथीमुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती संघाचे सरचिटणीस भय्याजी जोशी यांनी दिली.
अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक बैठक बंगळूर येथे 15 ते 17 मार्च दरम्यान होणार होती. या बैठकीत संघाच्या पुढील वाटचालीबाबात मंथन केले जाणार होते. कोरोना विषाणूंच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही नियोजित बैठक रद्द करण्यात आली असल्याचे भय्याजी जोशी यांनी सांगितले. या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सहभागी होणार होते.
कोरोनाच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी प्रशासनाला सहाय्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या मार्गाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता होती. गेल्या वर्षी आखलेल्या आराखड्याचा आढावा घेतला जाणार होता.