चेन्नई – इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) जरी 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली असली तरीही भारतीय संघाचा माजी कर्णधार व चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने सराव सामन्यात धडाकेबाज शतक फटकावले आहे.
इंग्लंडमध्ये गतवर्षी झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला होता. यानंतर गेले जवळपास 8 महिने धोनी क्रिकेटपासून लांब होता. तो पुनरागमन करणार की निवृत्त होणार या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, अखेर धोनीने आयपीएलमध्ये सरस कामगिरी करण्याचे ठरवत चेन्नई संघाच्या सराव शिबिरात सराव सुरू केला. या आधी झालेल्या सामन्यात धोनीने केवळ 5 चेंडू फलंदाजी करताना 5 षटकार फटकावून 30 धावांची खेळी केली होती.
शुक्रवारी झालेल्या आणखी एका सराव सामन्यात धोनीने आपण अद्याप फिनिशरच असल्याचे सिद्ध करत धडाकेबाज शतकी खेळी केली. धोनीने या सामन्यात केवळ 91 चेंडूंचा सामना करताना 123 धावा फटकावल्या. त्याने सुरेश रैनासह मैदान गाजविले, त्यावेळी करोनाच्या भीतीने मैदानात प्रेक्षक खूपच कमी होते. मात्र, तरीही धोनी… धोनी…चा गजर सुरू होता.