दोघांवर चाकू सारख्या हत्याराने वार
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर एका तरुणावर व त्याच्या मित्रांवर अनोळखी व्यक्तीने चाकू सारख्या हत्याराने वार केल्याची घटना गुरुवारी घडली. तसेच, तीन दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या वसतिगृहात दोन विद्यार्थ्यांनी दारू पिऊन धिंगाणा घातला. त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काही वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या आवारामध्ये विद्यापीठाच्याच सुरक्षा रक्षकाचा खून झाला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देत विद्यापीठात विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसवले होते. तसेच, पोलिसांकडून सुरक्षा ऑडिट करून संरक्षक भिंत बांधून घेतली. तसेच, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविली. सध्यस्थितीत महत्त्वाच्या ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक व होमगार्ड नियुक्त केले आहेत. सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी दिली आहे. त्यानंतरही सुरक्षेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.
विद्यापीठातील दोन विद्यार्थी संघटनांमध्ये काही महिन्यांपूर्वी हाणामारी झाली होती. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यातच दोन-तीन दिवसांपूर्वी वसतीगृह क्रमांक पाचमध्ये दोन मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घातला होता. त्यामुळे विद्यापीठात बेकायदेशीपणे राहून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
सुरक्षा व्यवस्थेसाठी विद्यापीठाने उचलले पाऊल
विद्यापीठाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने ठोस निर्णय घेतला आहेत. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जाईल. त्यानंतरच त्यांना विद्यापीठात प्रवेश मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांसह विद्यापीठात काही कामानिमित्त येणाऱ्या व्यक्तींची गैरसोय होऊ शकते. परंतु, विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहे.
मैदानावरील गैरप्रकाराशी विद्यापीठाचा संबंध नाही
विद्यापीठाच्या मैदानावर गुरुवारी घडलेल्या प्रकारातील व्यक्ती विद्यापीठाशी संबंधित नव्हत्या. मात्र, बाहेरील व्यक्ती विद्यापीठात येऊन गैरप्रकार करत असल्याच्या घटना अलीकडे निदर्शनास येत आहे. अशा बेकायदेशीरपणे येऊन विद्यापीठात गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करण्याबाबत विद्यापीठ ठोस उपाययोजना करणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.