रेडा -राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यातील प्रत्येक घटक पक्षांना आपला हक्काचा मंत्री म्हणून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे वाटतात. त्यामुळेच इंदापूर तालुक्यामध्ये विकासकामांचा धडाका सुरू आहे. तसेच इंदापूर तालुक्यातील तरूणांसाठी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील 128 कोटी रकमेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली निमगाव केतकी येथे ऑनलाइन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी सात जिल्हा परिषद मतदारसंघात, इंदापूर शहर येथे ऑनलाइन पद्धतीने कामांचे उद्घाटन केले.यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय घोगरे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, इंदापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, ऑनलाइन जोडले होते. तर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर, कार्याध्यक्ष अतुल झगडे, तात्यासाहेब वडापुरे, मच्छिंद्र चांदणे उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या की, भरणे यांच्या कामाचा दांडगा अनुभव असल्यामुळे ते शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडीच्या सरकारच्या प्रत्येक घटकाला हक्काचे वाटतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादीला मिळत आहे. केंद्र सरकारने खासदारांचा मिळणाऱ्या हक्काच्या फंडाला कात्री लावली आहे. परंतु राज्यातील सरकारने व वित्त मंत्री म्हणून अजित पवार यांनी कामे करण्यासाठी कोणतीही कात्री लावलेली नाही.
राज्याचे बजेट चांगले आहे, असा गौरव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. त्यामुळे ते कोणत्या पक्षाचे आहेत, यापेक्षा त्यांच्या भावना सत्य आहेत, हे महत्त्वाचे आहे.
भरणे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची इच्छा लाकडी-निंबोडी परिसरातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देण्याची होती. ही इच्छा खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व सरकारच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. शेतीच्या पाण्याचा, तालुक्यातील दळणवळणाचा प्रश्न हे राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुटत आहेत. एमआयडीसीमध्ये खासदार सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून नवे उद्योग व अद्ययावत सुविधा लवकरच निर्माण केल्या जातील. अशी ग्वाही त्यांनी दिली.
पाणी वाटपाची चूक दुरुस्त
इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांचे पाणी वाटप अत्यंत चांगल्या पद्धतीने आगामी काळासाठी करण्यात आलेले आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यातील जी जुन्या सरकारने पाणी वाटपाची चूक केली होती. ती चूक आता दुरुस्त केलेली आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशी ग्वाही सुळे यांनी दिली.