राजगुरूनगर -जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक करोना पॉझिटिव्ह असलेला तालुका खेड तालुका आहे. तालुक्यात पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले; मात्र ते 15 दिवसांतच “ओव्हर फ्लो’ झाले आहेत. त्यामुळे चांडोली, चाकण, आळंदी येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरु झाल्याचे समजते.
खेड तालुक्यात करोना पॉझिटिव्ह संख्या लक्षणीय असून त्यात दिवसागणिक वाढ होत आहे. याकडे नागरिक गांभीर्याने घेत नाहीत. आठवडे बाजारांसह सोने-चांदी, कपडे, भाजीपाला स्टॉल, फळ विक्रेते यांच्यासह हॉटेल्समध्ये सरकारी नियमांचे पालन न करता मोठी गर्दी करीत आहेत.
सुपर स्प्रेडर व्यावसायिकांच्या चाकण, आळंदी येथे आठव्या टप्प्यातील आजही (दि 27) अँटीजेन चाचण्या घेण्यात आल्या. यात चाकण येथे 124 जणांपैकी 48, आळंदीत 81 पैकी 13 पॉझिटिव्ह सापडले आहेत.
आळंदी आणि चाकण परिसरात सुपर स्प्रेडर व्यावसायिकांच्या आतापर्यंत 4560 जणांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी 559 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी दिली.
24 तासांत 132 पॉझिटिव्ह
खेड तालुक्यात 24 तासांत चाकण (37), आळंदी (5) राजगुरूनगर (11) नगरपरिषद हद्दीत एकूण 53 तर तर ग्रामीण भागातील चांडोली, कडूस, कोहिनडे बुद्रुक, खराबवाडी, कडाचीवाडी, कुरुळी, मेदनकरवाडी, म्हाळुंगे मोई, नाणेकरवाडी, निघोजे, वाकी खुर्द, येलवाडी, कोये, कुरकुंडी, पाईट, भांबुरवाडी, होलेवाडी, राक्षेवाडी, सांडभोरवाडी, सातकरस्थळ, तुकाईवाडी, वाकी बुद्रुक,चऱ्होली खुर्द, शेलपिंपळ्गाव, वडगाव घेनंद, गुळाणी कनेरसर या 28 गावांमध्ये नव्याने 79 असे तालुक्यात एकूण 132 करोना पॉझिटिव्ह आढळे आहेत.