पुणे -पुणे-अहमदनगर महामार्गावर पेरणेफाटा (कोरेगाव भीमा) येथे दि. 1 जानेवारी 2021 रोजी विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरुपात होणार आहे. मात्र, या मार्गावर दररोज होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन 31 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.
चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण या दोन्ही बाजूकडील जाणारी-येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अहमदनगरकडून पुणे, मुंबईकडे येणारे जड वाहने ही शिरूर, न्हावरा, पारगांव, चौफुला, यवत, हडपसर यामार्गे पुण्याकडे येतील. पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर, पुणे-सोलापूर महामार्गाने चौफुला केडगांव मार्गे न्हावरा, शिरूर, अहमदनररोड, अशी वाहतूक वळविण्यात आली आहे.
सोलापूर रस्त्यावरून आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने, मालवाहतूक (ट्रक-टेम्पो) हडपसर, मगरपट्टा, खरडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील. मुंबई येथून अहमदनगरकडे येणारे जड वाहने, माल वाहतूक (टेम्पो/ ट्रक) ही वाहने वडगांव मावळ, चाकण, खेड मंचर, नारायणगांव, आळेफाटा मार्गे अहमदनगरकडे जातील. तर मुंबईकडून अहमदनरच्या दिशेने येणारी हलकी वाहने कार, जीप इत्यादी वडगांव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगरकडे जातील.