मोहाली – कसोटी कारकिर्दीत शंभर कसोटी सामने खेळायला मिळतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. मुळातच भारतीय संघात स्थान मिळेल का, याची शाश्वती नव्हती. आज मी शंभरावा कसोटी सामना साजरा करत आहे. हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात अभिमानाचा क्षण आहे, अशा शब्दांत भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
कसोटी कारकिर्दीत शंभर कसोटी सामने खेळणाऱ्या कोहलीचा बीसीसीआयतर्फे खास सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
विराट कोहली म्हणाला, शंभराव्या कसोटीची कॅप माझ्या बालपणीच्या हिरोकडून मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझ्याकडे अंडर-15चा तो फोटो आजही ज्यात मी तुमच्यासोबत उभा आणि तुम्हालाच पाहात आहे. तसेच मी फक्त एवढंच सांगेन की आजच्या घडीला आम्ही तिन्ही फॉरमॅट, आयपीएलमध्येही खेळतो. नवी पिढी केवळ हेच पाहू शकते की मी क्रिकेटच्या सर्वात पवित्र फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळलो आहे.
दरम्यान, राहुल द्रविडसोबतचा फोटो विराटने शेअर केला. या फोटोबाबत विराटने लिहिले की, “अशाप्रकारचे क्षण तुम्ही कुठे पोहोचला आहात याची जाणीव करून देतात. स्वप्नं खरी होतात, असे मला वाटते.’