दुरुस्तीसाठी भटकंती – दुकाने सुरू करण्याची मागणी
पिंपरी – करोना संसर्गामुळे संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच व्यवसाय ठप्प आहेत. जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू असली तरी यामध्ये चष्मे दुरुस्तीच्या दुकानांचा त्यामध्ये समावेश नाही. यामुळे चष्मे नादुरुस्त झालेल्या लोकांची चांगलीच अडचण झाली आहे.
दृष्टीदोष असणाऱ्यांना चष्मा वापरल्याशिवाय वाचता येत नाही. अनेकांना दिसत नाही. तर काहींना चष्मा न वापरल्यामुळे अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. लॉकडाऊनमुळे चष्मे नादुरुस्त झालेल्या लोकांची चांगलीच अडचण झाली आहे. शहरात प्रत्येक ठिकाणी चष्मे दुरुस्तीची दुकाने आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे त्या व्यावसायिकांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे.
चष्मे खराब झाल्याने अनेकजण चष्मे दुरुस्त करणाऱ्यांना घरी बोलवत आहेत. मात्र दुकानात दुरुस्तीसाठी यंत्रसामग्री असते. ती सोबत नेणे शक्य नसल्याने अनेकांपुढे गंभीर समस्या उभी राहिली आहे. दुसरीकडे अनेकांचा उदरनिर्वाह चष्मे दुरुस्तीवर चालतो. अशा लोकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. याचा विचार करून चष्मे दुरुस्तीच्या दुकांनाना परवानगी द्यावी, अशी दुकानदारांची व नागरिकांची मागणी आहे.