मुंबई – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत. भाजप आणि समाजवादी पक्षात येथे थेट लढाई होणार होणार आहे. तर बहुजन समाज पक्ष फारसा आक्रमकतेने प्रचार करताना दिसत नाही. त्यातच आता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं आव्हान केलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही हल्लाबोल केला.
पंतप्रधान सभागृहात खोटं बोलले, हे सुद्धा काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते सभागृहात बोलू शकले नाहीत, अशी टीका करत पंतप्रधान मोदींनी देशात कोरोना आणला, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
दरम्यान केंद्र सरकारकडून विरोधकांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवली जात आहे. 2024 मध्ये भाजपची सत्ता आली तर ते संविधान बदलू शकतात, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.
यावेळी प्रकाश आंबेडकरांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला मतदान कऱण्याचं आवाहन केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही सपाला समर्थन देत आहोत. मी सर्व आंबेडकरवादी जनतेला देखील सांगत आहे, की उत्तर प्रदेशमध्ये सपाला मदत करा. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो. त्यामुळे आम्ही सपाला मदत करायचा निर्णय घेतल्याचं आंबेडकरांनी म्हटलं आहे.