न्यूयॉर्क – लहान मुले आणि महिलांसाठी लोकप्रिय असणारी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची टाल्कम पावडर आता जगभरातून मागे घेण्याचा विचार कंपनी करत आहे. या पावडरमुळे कर्करोग होण्याची शक्यतापुढे आल्याने आता या उत्पादनावर जगभरात बंदी घातली जाण्याची चिन्हे आहेत.
या पावडरमुळे कर्करोग झाल्याचे तब्बल 34 हजार खटले अमेरिकेत सुरू आहेत. अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने 2019 मध्ये या पावडरचे नमुने ताब्यात घेतले होते. त्यांची तपासणी केल्यावर त्यामध्ये अस्बेसटॉसच्या प्रकारातील कार्सिनोजेनिक फायबर्स आढळून आले होते. त्यानंतर उत्तर अमेरिकेतून कंपनीने स्वतःहून ही टाल्कम पावडर मागे घेतली. त्यानंतर कंपनीला पेचप्रसंगाचा सामना करावा लागला आणि त्यातून विक्री कमी झाल्याने हे उत्पादन कंपनीने संपूर्ण अमेरिकेतून मागे घेतले. मात्र युरोपातील देशांसह जगभरातील अन्य देशांमध्ये आजतागायत त्याची विक्री सुरू आहे.
आता ब्रिटनमधील ट्युलिपशेअर या गुंतवणूकदारांच्या ए व्यासपीठाने कंपनीच्या समभागधारकांना आवाहन करून या पावडरवर जगभरात बंदी घालण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार समभागधारकांनी आपल्या समभागाच्या प्रतींसह प्रस्ताव तयार करून अमेरिकेतील शेअरबाजाराचे नियमन करणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्सेंज कमिशन (एसईसी) या संस्थेकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर एप्रिलमध्ये होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सभेतही हा प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्नकेला जाणार आहे.
अमेरिकेतील मिसुरीमधील न्यायालयाने कर्करोगग्रस्त 22 महिलांच्या याचिकांवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या विरोधात निकाल दिल्याने कंपनीला 200 कोटी डॉलर (सुमारे 15 हजार कोटी रुपये) नुकसान भरपाई द्यावी लागलेली आहे. भविष्यात एवढी नुकसान भरपाई द्यावी लागू नये म्हणून कंपनीने पावडर उत्पादनांची स्वतंत्र कंपनी बनवली आणि वादग्रस्त पद्धतीने ती दिवाळखोर असल्याचे दाखवले. एवढे सगळे करावे लागूनही कंपनीच्या टाल्कम पावडरमुळे कर्करोग होतो हे मानण्यास कंपनी तयार नाही.
वेगवेगळे अहवाल पुढे करून कंपनी पावडरमुळे कर्करोग होत नसल्याचे सातत्याने सांगत आहे. आता कंपनीच्या समभागधारकांनीच या उत्पादनावर जगभरात बंदी घालण्याची मागणी करणारा प्रस्ताव एसईसीकडे सादर केल्यावर हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात यावा असे निवेदन एसईसीला दिले आहे.