देहूगाव : संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देहू येथे येत आहेत. या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. स्वच्छता व सुरक्षितता याकडे लक्ष दिले जात आहे. सर्व आवश्यक कामे झाल्यामुळे देहूचे रूप पालटले आहे. तर मोदी ज्याठिकाणी भेट देणार आहेत, त्याठिकाणी वाहनांच्या ताफ्याची रंगीत तालीम घेण्यात आली.
पंतप्रधान हे दुपारी हेलिकॉप्टरने आल्यानंतर झेंडे मळा येथील हेलिपॅडवर आगमन होईल. त्याकरिता तीन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. तेथून मोटारीने माळवाडी, परंडवाल चौक, मुख्य कमान मार्गाने 14 कमानीजवळ पोचतील. कमानीजवळ मोटारीतून पायी मंदिराजवळ पोहचतील. चारशे वारकऱ्यांसमवेत लोकार्पण सोहळा पार पडेल. या सोहळ्यानंतर पुन्हा मोटारीने सभास्थानी येतील. येथे 22 एकरात मंडप उभारण्यात आला आहे. मध्यभागी दोन मोठे मंडप, स्टेज असून डावी आणि उजवीकडे दोन लहान मंडप टाकण्यात आले आहेत.
रस्ते वाहतुकीसाठी बंद
-पुणे मुंबई महामार्गावरील देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी कमानीपासून देहू गाव रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.
-निगडीतील भक्ती शक्ती चौक- तळवडे- कॅनबे चौक पर्यायी रस्ता.
-तळेगाव चाकण रस्त्यावरील देहू फाटा ते परंडवाल चौक व्हीआयपी वाहनं शिवाय इतर वाहनांना वाहतुकीसाठी बंद राहील.
-देहू कमान ते 14 टाळकरी कमान पर्यंत रस्ता बंद राहील.
-साईराज चौक- सांगुर्डी फाटा- परंडवाल चौक- भैरवनाथ चौक ते मुख्य मंदिर रस्ता बंद.