पंतप्रधानांनी किमान 12 कोटी हिंदूंना तरी रोजगार द्यावा

नवी दिल्ली – एकीकडे आसाममधील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सरकारी मदरसे बंद करण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे भाजपमधून कॉंग्रेसमध्ये गेलेल्या एका नेत्याने कुंभमेळ्यावर केल्या जाणाऱ्या खर्चाचा प्रश्‍न उपस्थित केला आहे. या विषयांवर तापलेले वातावरण अद्याप थंड झालेले नसतानाच एमआयएमच्या प्रवक्‍त्याने वेगळा तर्क मांडला आहे.

प्रवक्‍ते असीम वकार यांना मदरसा आणि कुंभमेळ्याच्या तुलनेबाबत विचारणा केली असता 2014 च्या निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी दोन कोटी नागरिकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख देण्याचे आश्‍वासनही दिले होते. त्या हिशेबाने आतापर्यंत गेल्या सहा वर्षांत 12 कोटी युवकांना रोजगार मिळायला हवा. त्यांनी आम्हाला नको, किमान सहा कोटी हिंदू युवकांना तरी रोजगार द्यावा. तेवढ्याच हिंदूंना प्रत्येकी पंधरा लाख रुपये द्यावेत. तसे केल्यावर मग मदरसे बंद करा. एकही सुरू राहू देऊ नका. एखादा मदरसा सुरू असेल तर आपण स्वत: सरकारला त्याची माहिती देऊ, असे ते म्हणाले.

आसामचे शिक्षण आणि अर्थमंत्री हेमंत विश्‍व शर्मा यांनी राज्यातील सर्व मदरसे आणि संस्कृतचे शिक्षण दिले जाणाऱ्या संस्था बंद करण्याचे सूतोवाच केले आहे. धार्मिक आधारावर दिल्या जाणाऱ्या शिक्षणासाठी आमचे सरकार पैसा खर्च करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या आसाम सरकार 614 मदरसे आणि 100 संस्कृत विद्यालये चालवत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.

त्यावर धर्माच्या नावावर शिक्षण नको आणि कोणते कर्मकांडही व्हायला नको, असे वक्‍तव्य काल कॉंग्रेसचे नेते उदित राज यांनी केले होते. त्यांनी कुंभमेळ्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या निधीचा मुद्दाही उपस्थित केला होता. यासाठी 4200 कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे ते म्हणाले होते व त्याला त्यांनी आक्षेप घेतला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.